बीड शहरातील जालना रोडवरील मिनाक्षी हॉटेलसमोर जुन्या वादाची कुरापत काढून एका २४ वर्षीय ट्रॅक्टर चालकावर पाच जणांच्या टोळक्याने लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.
१२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला असून, जखमी तरुणाचे नाव ओंकार अभिमान केदार असे आहे. जिरेवाडी येथील शेतकरी व ट्रॅक्टर चालक असलेला ओंकार हा हॉटेल परिसरात असताना नितीन क्षीरसागर, हनुमान क्षीरसागर, सचिन क्षीरसागर, शहाजी लांडगे आणि यश कसबे यांनी बेकायदेशीर मंडळी जमवून त्याला घेरले. आरोपींनी ओंकारला अश्लील शिवीगाळ करत खाली पाडले आणि बेदम मारहाण सुरू केली. यावेळी एका आरोपीने थेट त्याच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याला रक्तबंबाळ केले. जर पोलिसांत तक्रार दिली तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या हल्ल्यानंतर गंभीर जखमी ओंकार केदार याने बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार दुबाले पुढील तपास करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!