बीड शहरातील शांतिनिकेतन शाळेजवळ १९ सप्टेंबरच्या रात्री गाडी देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून दोघांनी तरुणाला मारहाण करून त्याची स्विफ्ट डिझायर गाडी जबरदस्तीने घेऊन गेल्याची घटना घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुधीर हनुमान वाघमारे (२५) आणि प्रीतम गणेश हनवते (१९) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अशोक दत्तात्रय करांडे (४२, व्यवसाय शेती, रा. कोळगाव, ता. गेवराई) हे मित्राची स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक एमएच २३ एडी १४२४ घेऊन शांतिनिकेतन शाळेजवळ आले होते. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याकडे गाडी मागितली. गाडी देण्यास नकार दिल्यानंतर एकाने कानाखाली चापट मारली, तर दुसऱ्याने जबरदस्तीने गाडीतून बाहेर काढून रस्त्यावर ढकलले. त्यानंतर दोघांनी गाडी घेऊन तेथून पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी २० सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.