केज - बीड जिल्ह्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी आणि प्रलंबित मागण्या तातडीने निकाली काढाव्यात, या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सोमवारी केज तहसील कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून वाजत-गाजत आणि शासनविरोधी घोषणा देत हा मोर्चा काढण्यात आला. मागण्यांवर तत्काळ निर्णय न झाल्यास तीव्र चक्का जाम आंदोलन छेडण्याचा इशारा भाई गुंड यांनी प्रशासनाला दिला.
करपलेल्या पिकांची होळी करून शासनाचा निषेध
पावसाअभावी खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून उत्पादन खर्च निघणेही मुश्कील झाले आहे. अशा संकटात सन २०२५ चा खरीप व रब्बी पीकविमा अद्याप मिळालेला नाही. केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष मदत कधी देणार, असा जाब विचारत संतप्त मोर्चेकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर करपलेल्या पिकांची होळी केली. मोर्चादरम्यान जिल्हा चिटणीस ॲड. नारायण गोले पाटील आणि बापूसाहेब सोळुंके यांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर कडाडून टीका केली.
तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन
मोर्चानंतर शिष्टमंडळाने तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर केले. यामध्ये जिल्ह्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपयांचे अनुदान देणे, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करणे, प्रलंबित पीकविमा वाटप करणे, शेतीपंपांसह घरगुती वीज बिल पूर्ण माफ करणे, दिवसा किमान आठ तास अखंड वीजपुरवठा करणे, स्मार्ट मीटरची सक्ती थांबवणे, उसाचा दुसरा हप्ता त्वरित अदा करणे आणि केज शहरातील शेतकऱ्यांनाही ग्रामीण योजनांचे लाभ देणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
या आंदोलनात हनुमंत भोसले, डॉ. हनुमंत सौदागर, प्रकाश भन्साळी, राहुल खोडसे, राष्ट्रपाल पाटुळे, महिला आघाडीच्या शिवकन्या गुंड, सविता आकुसकर, भाई अशोक रोडे, शंभुराजे पाटील, ॲड. निखिल बचुटे, हभप अशोक महाराज, मंगेश देशमुख, महेश गायकवाड, दिनकर बप्पा कदम यांच्यासह शेकडो शेतकरी बैलगाड्यांसह सहभागी झाले होते.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!