अंबाजोगाई: तालुक्यातील धानोरा येथे शेताच्या बांधावरून जाण्याच्या आणि कुपाटी टाकण्याच्या कारणावरून एकाच कुटुंबातील दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारीत काठ्या आणि विळ्याचा वापर करण्यात आला असून दोन्ही गटांनी एकमेकांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या प्रकरणात ऋषीकेश दत्ता मुळे (वय २३, रा. धानोरा) याने फिर्याद दिली आहे. शेताच्या बांधावरून जाण्याच्या वादातून सुनिल सदाशिव मुळे, आमोल रामराव मुळे, दिनेश बाळासाहेब मुळे आणि रामेश्वर बाळासाहेब मुळे (सर्व रा. धानोरा) यांनी ऋषीकेश, त्याची आजी आणि चुलत भावाला काठी, विळा आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच परत बांधावरून गेल्यास जिवंत न सोडण्याची धमकी दिली.

दुसऱ्या प्रकरणात सुनिल सदाशीव मुळे (वय ५५, रा. धानोरा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शेताच्या बांधावर टाकलेली कुपाटी काढल्याच्या कारणावरून वाद झाला. यात ऋषीकेश दत्ता मुळे, दैवसाला गुरुलिंग मुळे, रेखा दत्ता मुळे आणि कांताबाई दगडू मुळे (सर्व रा. धानोरा) यांनी सुनिल आणि त्यांच्या पुतण्यांना काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात एकूण आठ जणांवर मारहाण आणि धमकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सचिन सिद्धेश्वर हे करीत आहेत.