बीड: खरीप पिकांचे झालेले अतोनात नुकसान आणि जिल्ह्यातील गंभीर दुष्काळी स्थिती लक्षात घेता बीड जिल्ह्यात तात्काळ 'कोरडा दुष्काळ' जाहीर करावा, या मागणीसाठी आज हजारो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट आक्रोश मोर्चा काढला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) सरचितणीस आमदार रोहित पवार आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकरी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पावसाने दडी मारल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाने तात्काळ आर्थिक मदत आणि आवश्यक सवलती द्याव्यात, यासाठी प्रशासनावर हा दबाव आणण्यात आला.

मागण्या मान्य न झाल्यास समृद्धी महामार्ग रोखणार : रोहित पवार

मोर्च्याला संबोधित करताना आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. दुष्काळाच्या संकटात शेतकरी होरपळत असताना शासन केवळ कागदी औपचारिकता पूर्ण करण्यात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला. पुढील १५ दिवसांत सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठोस निर्णय न घेतल्यास हजारो शेतकऱ्यांना घेऊन समृद्धी महामार्ग पूर्णपणे रोखला जाईल, असा इशारा पवार यांनी दिला. तर दुसरीकडे, हा केवळ मोर्चा नसून शेतकऱ्यांच्या हक्काचा एल्गार आहे, दुष्काळ जाहीर करून नुकसानभरपाई मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, असे आमदार संदीप क्षीरसागर यांनी ठणकावून सांगितले.

पीक विमा आणि दुष्काळाच्या कायमस्वरूपी उपायांची मागणी

या आंदोलनादरम्यान सभेला संबोधित करताना शिक्षक नेते प्रा. विजय पवार यांनी जिल्ह्यातील गंभीर स्थिती मांडली. दर तीन वर्षांनी बीडला दुष्काळाचा सामना करावा लागत असून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. २०२५ चा सुमारे ८०० कोटी रुपयांचा पीक विमा जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही, तसेच बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. संदीप क्षीरसागर हे सर्वसमावेशक आणि विश्वासू नेतृत्व असून पक्षाने त्यांच्यावर पूर्ण विश्वासाने मोठी जबाबदारी टाकावी, असे आवाहनही त्यांनी केले. मोर्चाच्या शेवटी आंदोलकांच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर केले.