बीड - शहरातील मध्यवर्ती हिरालाल चौक परिसरातील पांडे गल्ली येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम यांच्या पथकाने सोमवारी पहाटे धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या १४ जणांना रंगेहात ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून रोख रकमेसह एकूण ४ लाख २२ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पहाटेच्या सुमारास धडक कारवाई

पांडे गल्ली परिसरातील एका ठिकाणी काही इसम मोठ्या प्रमाणावर पैशांची पैज लावून जुगार खेळत असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने २१ सप्टेंबर रोजी पहाटे अचानक छापा टाकला. या वेळी जुगार खेळताना आढळलेल्या १४ जणांना पोलिसांनी जागेवरच ताब्यात घेतले. घटनास्थळावरून रोख रक्कम, जुगाराचे पत्ते आणि इतर साहित्य असा एकूण ४ लाख २२ हजार १७० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

पेठ बीड पोलिसांत गुन्हा दाखल

या प्रकरणी संबंधित १४ जुगारींविरुद्ध पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सय्यद, पोलीस हवालदार राहुल शिंदे, अशोक दराडे, पोलीस अंमलदार अविनाश सानप, कुलदीप औसरमल, शशिकांत ढाकणे आणि विशाल यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.