बीड: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बीड विभागातील विविध ११ बसस्थानकांवर तृतीयपंथीय व्यक्तींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्याच्या कामाला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यासाठी बीड विभागाला एकूण २६ लाख ४० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, याबाबतचा शासन निर्णय १४ ऑक्टोबर २०२६ रोजी परिवहन विभागाने जारी केला आहे.

बसस्थानकांवर तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने त्यांना सामाजिक व शारीरिक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांची ही कुचंबणा थांबवण्यासाठी परिवहन व सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांनी एसटी महामंडळाला तातडीने पावले उचलण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्यभरातील विविध बसस्थानकांवर स्वच्छतागृहे उभारण्यासाठी ९ कोटी ७६ लाख ६३ हजार १९५ रुपयांच्या एकत्रित निधीला मान्यता देण्यात आली असून, यामध्ये बीड विभागाचाही समावेश आहे. या बांधकामाचा खर्च सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या तृतीयपंथीय कल्याण निधीतून केला जाणार आहे.

बीड विभागातील ११ बसस्थानकांवर प्रत्येकी ६ चौरस मीटर क्षेत्रफळाचे तळमजल्यावरील स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहे. एका स्वच्छतागृहाच्या बांधकामासाठी पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण आणि वस्तू व सेवा करासह (GST) अंदाजे २ लाख ४० हजार रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यानुसार ११ स्वच्छतागृहांसाठी २६ लाख ४० हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. काम सुरू करण्यापूर्वी नकाशांना वास्तुविशारदांची मंजुरी आणि संबंधित कार्यकारी अभियंत्यांची तांत्रिक मान्यता घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.