बीड: राज्य सरकारने शनिवारी राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून, यामध्ये बीड जिल्ह्यातील सर्व अकरा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. पावसाच्या अभावामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मोठा निर्णय घेतला असून, २५ सप्टेंबर २०२६ च्या शासन निर्णयानुसार विविध सवलती तत्काळ लागू करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे बीडसह राज्यातील ७५ टक्के भागातील शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बीड जिल्ह्याला पूर्णतः कव्हर
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन केल्यानंतर बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर आणि वडवणी या सर्व अकरा तालुक्यांमध्ये प्रथम ट्रिगर-१ लागू करण्यात आला आहे. या सर्व भागात पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून, पिकांची स्थिती दर्शवणारे जीपीएस आधारित छायाचित्र संकलित केले जाणार आहेत.
शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सवलती
दुष्काळ जाहीर झाल्यामुळे आपद्ग्रस्त नागरिकांना शासनाकडून मोठा आधार मिळणार आहे. जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कृषी पंपाच्या चालू वीजबिलात सूट दिली जाणार असून, शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात पूर्ण माफी देण्यात आली आहे. जनावरांसाठी चारा आणि आवश्यक तेथे पिण्याच्या पाण्याचे टँकर्स सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. रोजगार हमी योजनेच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू केली जाणार असून शेतकरी आणि मजुरांना अन्नधान्य पुरवण्याची व्यवस्था उभी केली जाणार आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!