बीड - निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका यंदा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला असून पावसाळा संपत आला तरी अपेक्षित पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात तब्बल ४० दिवसांचा मोठा पावसाचा खंड पडल्यामुळे खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला १० व ११ तारखेला झालेल्या पावसाने जमिनीत थोडा ओलावा निर्माण करून पिकांना दिलासा दिला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तापमानात अचानक झालेल्या वाढीमुळे जमिनीतील तो ओलावाही पूर्णपणे संपला असून सोयाबीन, कपाशीसह तूर ही पिके करपण्याच्या मार्गावर आहेत.

वाढत्या उन्हामुळे शेंगा भरण्याच्या प्रक्रियेला फटका

जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी कमाल तापमान ३५.८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. सलग वाढलेल्या या तापमानामुळे आणि दुपारच्या कडक उन्हामुळे जमिनीत ओलावा उरलेला नाही. याचा थेट प्रतिकूल परिणाम सध्या सर्वसाधारण स्थितीत असलेल्या सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या प्रक्रियेवर होत आहे. या दीर्घ खंडामुळे यंदा सोयाबीनच्या उत्पादनात तब्बल ४० ते ५० टक्क्यांपर्यंत मोठी घट होण्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. पावसाच्या अभावाने आणि वाढत्या उष्णतेने कपाशीच्या वाढीवरही अत्यंत वाईट परिणाम झाला आहे.

हवामान विभागाचा पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांमध्ये साशंकता

यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने जमिनीत पुरेसा ओलावा शिल्लक राहिलेला नाही. त्यातच कडक ऊन पडत असल्याने हा ओलावा वेगाने नष्ट होऊन पिकांच्या नैसर्गिक वाढीवर गंभीर परिणाम होत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २४ ते २६ सप्टेंबर या कालावधीत काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र, यंदा पावसाचे अनेक अंदाज फोल ठरल्यामुळे प्रत्यक्षात दमदार पाऊस झाल्याशिवाय पिकांना नवसंजीवनी मिळणार नाही, अशी धास्ती बीडमधील बळीराजाने व्यक्त केली आहे.