बीड: जिल्ह्यातील केज आणि पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 'ई-पीक पाहणी' मोहिमेत शासनाची मोठी फसवणूक उघडकीस आली आहे. प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांचे थेट फोटो घेण्याऐवजी जुनेच फोटो अपलोड केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार दोन ई-पीक पाहणी साहाय्यकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई गुरुवारी, २४ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आली असून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) अन्वये हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

केज तालुक्यात १५७ बोगस नोंदी
जिवाचीवाडी येथील ई-पीक पाहणी साहाय्यक रामदास देविदास सारुक याने १९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत प्रत्यक्ष शेतात न जाता जुन्या फोटोंवरून (पिक्चर इन पिक्चर) तब्बल १५७ बोगस फोटो अपलोड केले. या गैरप्रकाराबाबत ग्राम महसूल अधिकारी अश्विनी लक्ष्मण गुळभिले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार केज पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारळवाडीतही शासनाची फसवणूक
दुसरी घटना पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारळवाडी येथे घडली. ग्राम महसूल अधिकारी ओमकार मधुकर गायके यांच्या तक्रारीवरून साहाय्यक रामा वामन मसवले याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मसवले याने १३ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान याच पद्धतीने ६९ खोटे फोटो संकेतस्थळावर अपलोड केले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर तहसीलदार आणि कार्यकारी दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. ई-पीक पाहणी हा शासनाचा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प असून याद्वारे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळतो. मात्र, जाणीवपूर्वक चुकीची माहिती पुरवून शासनाची दिशाभूल केल्याने पोलीस आता या दोन्ही प्रकरणांचा सखोल तपास करत आहेत.