बीड: भारतीय हवामानशास्त्र विभागाने बीड जिल्ह्यासाठी नवीन हवामान अंदाज जाहीर केला असून, येत्या १८ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली आहे. विशेषतः २० ऑक्टोबरला जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाच्या सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभागाच्या अधिकृत माहितीनुसार १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात हवामान कोरडे राहील. मात्र, १८ ऑक्टोबरला हलक्या पावसाची तर १९ ऑक्टोबरला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. २० ऑक्टोबरला वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढणार असल्याने प्रशासनाने आणि हवामान विभागाने शेतकऱ्यांसाठी विशेष कृषी सल्ला जारी केला आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी काढणीला आलेली पिके लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी हलवावीत आणि जर मळणी शक्य नसेल तर कापलेले पीक पावसापासून वाचवण्यासाठी ताडपत्रीने व्यवस्थित झाकून ठेवावे. तसेच, वादळी वाऱ्याच्या वेळी नागरिकांनी मोकळ्या मैदानात काम करणे टाळावे, झाडाखाली उभे राहू नये आणि जनावरांना सुरक्षित गोठ्यातच बांधावे असे आवाहन करण्यात आले आहे.