अंबाजोगाई: महाराष्ट्र शासनाचा मानाचा 'वाचन प्रेरणा पुरस्कार' मिळाल्याबद्दल अनुराग पुस्तकालयाचे संचालक अभिजीत जोंधळे व त्यांच्या कुटुंबीयांचा आंतरभारती शाखा अंबाजोगाईच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. जोंधळे यांच्या निवासस्थानी असलेल्या अनुराग पुस्तकालयात हजारो पुस्तकांच्या साक्षीने हा सोहळा अत्यंत आत्मीय वातावरणात पार पडला.

साहित्याच्या साक्षीने सन्मान सोहळा

अभिजीत जोंधळे यांना १५ ऑक्टोबर २०२६ रोजी शासनाचा वाचन प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. समाजात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी आणि वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत हा गौरव करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आंतरभारती संस्थेने त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. पुस्तकांच्या सानिध्यात पार पडलेल्या या सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली.

मान्यवरांची उपस्थिती

या सत्कार समारंभास आंतरभारतीचे राष्ट्रीय विश्वस्त व मार्गदर्शक अमर हबीब, अंबाजोगाई शाखेच्या अध्यक्षा प्रा. डॉ. शैलजा बरुरे, उपाध्यक्ष वैजनाथ शिंगोळे, कोषाध्यक्ष महावीर भगरे आणि कार्यकारणी सदस्य शरद लंगे, तारका वानखेडे व योगिनी अनिकेत यांची प्रमुख उपस्थिती होती.

याशिवाय घाटनांदूर शाखेचे सचिव दत्ता वालेकर, पत्रकार किरण देशमुख, रेखा देशमुख, मित्व योगिनी अनिकेत, कृष्णा मस्के, निकिता शितोळे यांच्यासह जोंधळे यांच्या मातोश्री, अनुराधा अभिजीत जोंधळे आणि हर्षाली जोंधळे आदी कुटुंबीय व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.