बीड: जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मुगाव मार्गावरील शृंगेरी घाटात रात्रीच्या सुमारास एका ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने तो थेट खोल दरीत कोसळला. या भीषण अपघातानंतर ट्रकला अचानक भयानक आग लागली. या भयंकर आगीत होरपळून ट्रकचालक सागर सोमनाथ इंदलकर यांचा जागीच अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला असून, या अपघाताची भीषणता काळजाला घरे पाडणारी आहे.
अपघात इतका भयंकर होता की, ट्रकने घेतलेल्या पेटामुळे आजूबाजूच्या डोंगरालाही आग लागली आणि आगीने अल्पावधीतच रौद्ररूप धारण केले. दरी खूप खोल असल्याने आणि आगीचे लोळ उठत असल्याने ग्रामस्थांना सुरुवातीला तिथे पोहोचणे कठीण झाले होते. सुरुवातीला चालक कुठेही आढळून आला नाही. मात्र, मुगावच्या काही धाडसी तरुणांनी जीव धोक्यात घालून जवळ जाऊन पाहिले असता, चालक जळून खाक झाल्याचे विदारक दृश्य समोर आले.
घटनेची माहिती मिळताच मुगावच्या ग्रामस्थांनी आणि आष्टी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या आष्टी पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, या तपासानंतरच अपघाताचे नेमके कारण अधिकृतरीत्या स्पष्ट होऊ शकणार आहे. या भयंकर घटनेमुळे संपूर्ण परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!