बीड - महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत बीड जिल्ह्यातील ५७,८७३ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर चौथ्या यादीनुसार ५८९ कोटी ९३ लाख रुपयांची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ऐन हंगामात जिल्ह्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकांच्या खातेदारांना मोठा लाभ

४ नोव्हेंबर २०२६ रोजी जाहीर झालेल्या या चौथ्या यादीमध्ये बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पीक कर्ज घेतलेल्या १,४८७ शेतकऱ्यांच्या ६ कोटी ९५ लाख रुपयांचा समावेश आहे. उर्वरित बहुतांश रक्कम राष्ट्रीयकृत बँका आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग करण्यात आली आहे. यापूर्वी जाहीर झालेल्या तीन याद्यांमधून १ लाख १० हजार ८७८ शेतकऱ्यांना ९१८.५६ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मंजूर झाली होती. नव्या यादीसह आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १ लाख ६८ हजार ७५१ शेतकऱ्यांना तब्बल १,५०८ कोटी ४९ लाख रुपयांची विक्रमी कर्जमाफी मिळाली आहे.

प्रमाणीकरण प्रलंबित शेतकऱ्यांना प्रशासनाचे आवाहन

योजनेअंतर्गत आतापर्यंत नाव जाहीर झालेल्या २ लाख ४ हजार ३६६ थकीत कर्जदार शेतकऱ्यांपैकी १ लाख ७५ हजार ४२९ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. मात्र, अद्यापही २८ हजार ९३७ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण बाकी असून त्यातील ११ हजार ८० शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी उपलब्ध नाही. लाभापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण तात्काळ पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा उपनिबंधक सतिश तोटावार यांनी केले आहे.