कडा (बीड): आष्टी तालुक्यात पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्याने निर्माण झालेल्या भीषण दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार सुरेश धस यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर धाव घेतली. तालुक्यात खरीप हंगामातील पिके पाऊस नसल्याने करपून जात असून, विहिरी आणि जलस्रोतांनी तळ गाठल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी शेतांमध्ये प्रत्यक्ष जाऊन पिकांची स्थिती, पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याच्या समस्येबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधत सविस्तर माहिती जाणून घेतली.
पिकांची वाढ खुंटली, चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर
तालुक्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने बहुतांश भागांत खरीप पिकांना पाण्याचा तीव्र ताण जाणवत असून पिकांची वाढ खुंटल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेतीसोबतच पशुधनासाठी चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. केवळ शेतीच नव्हे, तर ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाईही दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी फक्त कागदोपत्री न ठेवता प्रत्यक्ष बांधावर जाऊन समजून घेत, पाणी, चारा आणि पीक नुकसानीबाबत शासनस्तरावर तातडीने पाठपुरावा करण्याचे संकेत या पाहणीदरम्यान आमदार धस यांनी दिले.
नुकसानग्रस्त भागांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याची गरज
पावसाअभावी करपून गेलेल्या पिकांचे प्रशासनाने तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करून शासनाच्या निकषानुसार बाधित शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. संभाव्य दुष्काळी संकटाचा सामना करण्यासाठी गावनिहाय आढावा घेऊन चारा छावण्या अथवा चारा डेपो सुरू करणे तसेच पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये तात्काळ टँकरसह आवश्यक उपाययोजना राबविण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!