केज / बीड: ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय व आर्थिक सेवा गावातच उपलब्ध व्हाव्यात यासाठी खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे, केज तालुक्यातील आनंदगाव सारणी येथे नवीन शाखा टपाल कार्यालय सुरू करण्यास भारतीय डाक विभागाने अधिकृत मंजुरी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर परिसराच्या पोस्टमास्तर जनरल कार्यालयाने ३० सप्टेंबर रोजी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे आनंदगाव सारणीसह लगतच्या परिसरातील नागरिकांची दूरवर जाण्याची गैरसोय कायमची दूर होणार आहे.

प्रशासकीय रचना व सुविधांची तयारी

भारतीय डाक विभागाच्या आदेशानुसार, हे नवीन टपाल कार्यालय बनसारोळा उपडाकघराच्या अंतर्गत कार्यरत राहणार असून, त्याचे प्रशासकीय नियंत्रण अंबाजोगाई उपविभागाकडे सोपवण्यात आले आहे. या कार्यालयाच्या कामकाजासाठी स्वतंत्र शाखा डाकपाल पदाची निर्मिती करण्यात आली आहे. नवीन टपाल कार्यालयासाठी आवश्यक जागा, फर्निचर आणि टपाल वाहतूक व्यवस्था तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश बीडच्या टपाल अधीक्षकांना देण्यात आले आहेत.

गावातच मिळणार आर्थिक व टपाल सेवा

स्वतंत्र टपाल कार्यालय सुरू झाल्यामुळे परिसरातील शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सुकन्या समृद्धी योजना, टपाल बचत बँक, ज्येष्ठ नागरिक पेन्शन वितरण, शासकीय अनुदानांचे व्यवहार आणि किसान विकास पत्रासारख्या महत्त्वाच्या योजनांचा लाभ आता थेट गावातच मिळणार आहे. अनेक वर्षांची प्रलंबित मागणी मार्गी लागल्याने आनंदगाव सारणी येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत खा. बजरंग सोनवणे यांचे आभार मानले आहेत.