अंबाजोगाई: येथील ऐश्वर्या राजेंद्रकुमार टाक यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने वाणिज्य विषयात नुकतीच विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी जाहीर करण्यात आली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांवर (एमएसएमई) झालेला परिणाम आणि त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील प्रभाव या विषयावर त्यांनी केलेल्या सखोल संशोधनाची दखल घेत विद्यापीठाने त्यांना ही पदवी बहाल केली आहे.

कोविडपूर्व आणि नंतरच्या एमएसएमई स्थितीवर संशोधन

ऐश्वर्या टाक यांनी नवगण महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. मधुकर आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली हा शोधनिबंध पूर्ण केला. त्यांनी ’कम्पॅरेटिव्ह स्टडी ऑफ एमएसएमई ऑफ प्री अ‍ॅण्ड पोस्ट कोविड-१९ अ‍ॅण्ड इट्स इम्पॅक्ट ऑन इंडियन इकॉनॉमी विथ स्पेशल रेफरन्स टू मराठवाडा रिजन’ या विषयावर विशेषतः मराठवाड्याचा संदर्भ घेऊन उपयुक्त संशोधन सादर केले. या संशोधनासाठी त्यांना वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. सय्यद अझरुद्दीन यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

पत्रकारितेतही सुवर्ण कामगिरी

संशोधनापूर्वी ऐश्वर्या टाक यांनी देशातील नामांकित ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन’ (आयआयएमसी) या संस्थेतून इंग्रजी पत्रकारितेतील पदविका यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. याशिवाय, त्यांनी बी.जे. (पत्रकारिता पदवी) परीक्षेत विद्यापीठातून प्रथम क्रमांक पटकावून मानाचे जवाहरलाल दर्डा स्मृती पारितोषिक मिळवले होते. या यशामागे आई सुनंदाताई टाक यांचे मोठे पाठबळ असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळातून कौतुक होत आहे.