केज: अवर्षणामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता आगीचे नवे संकट ओढवले आहे. केज तालुक्यातील टाकळी येथे काढणी करून ठेवलेल्या चार शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या गंजीला अज्ञात इसमाने आग लावून खाक केल्याची धक्कादायक घटना घडली. सोमवारी (दि. १२ ऑक्टोबर) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत शेतकऱ्यांचे सुमारे १४ लाख रुपयांचे अतोनात नुकसान झाले असून परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.
चार शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट जळून खाक
टाकळी शिवारात शिवाजी कोंडीबा बारगजे, राजेंद्र कोंडीबा बारगजे, शंकर कोंडीबा बारगजे आणि दशरथ कोंडीबा बारगजे या चार शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी करून शेतात गंजी रचून ठेवली होती. अज्ञात व्यक्तीने या गंजींना अचानक आग लावली. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केल्याने धुराचे लोट पसरले. माहिती मिळताच संबंधित शेतकरी, शेजारी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला; मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने सर्व सोयाबीन जळून भस्मात झाले. या प्रकरणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पाच दिवसांत सहावी घटना; पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
टाकळी परिसरात सोयाबीनच्या गंजी पेटवून देण्याचा विकृत सिलसिला सलग पाच दिवसांपासून सुरू आहे. यापूर्वी ७ ऑक्टोबर रोजी बाबासाहेब घुले, तर ११ ऑक्टोबर रोजी गिरजाबाई घुले यांच्या सोयाबीनच्या गंजींना आग लावण्यात आली होती. त्यानंतर आता एकाच वेळी चार शेतकऱ्यांचे सोयाबीन पेटवून देण्यात आले. मागील पाच दिवसांतील ही सहावी घटना असून या आगीच्या घटनांमध्ये आतापर्यंत परिसरातील शेतकऱ्यांचे सुमारे ४० ते ५० लाखांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेणारा तो समाजकंटक कोण, याचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
दुष्काळात शेतकऱ्यांवर दुहेरी आघात
यंदा पावसाच्या खंडामुळे शेतात म्हणावे तसे उत्पन्न निघाले नाही. निसर्गाच्या लहरीपणाशी दोन हात करत शेतकऱ्यांनी जे काही सोयाबीन पदरात पाडून घेतले होते, तेही आता आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. हाता-तोंडाशी आलेले पीक डोळ्यादेखत जळून राख झाल्याने बळीराजा पूर्णपणे कोलमडून गेला असून, महसूल व पोलीस प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी आणि संशयिताला बेड्या ठोकाव्यात, अशी संतप्त मागणी ग्रामस्थांतून होत आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!