केज  - आठवडी बाजारातून क्षमतेपेक्षा जास्त गुरे भरून अंबाजोगाईकडे चाललेले पिकअप युसुफवडगाव पोलिसांनी पकडले. याप्रकरणी पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

     साळेगाव येथील आठवडी बाजारातून क्षमतेपेक्षा जास्तीची गुरे पिकपमध्ये भरून हे पिकअप माळेगाव मार्गे अंबाजोगाईकडे जात असल्याची गुप्त माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, सहाय्यक फौजदार बिडगर, पोलीस अंमलदार हनुमंत गायकवाड यांनी कळंब - अंबाजोगाई रस्त्यावर धनेगाव फाट्यावर सापळा लावून ८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास पिकअप (एम. एच. २३ बी. एच. १९६४) पकडले. पोलिसांनी पिकअपची झडती घेतली असता पिकअपमध्ये गोवंशीय जातीचे लहान - मोठी सहा जनावरे कोंबुन त्यांची चारा - पाण्याची सोय न करता भरल्याचे दिसुन आले. पिकअप चालक मोहम्मद जकरिया मोहम्मद जमिलोद्दीन खुरेशी (रा. सायगांव ता. अंबाजोगाई) यास गोवंश जातीचे जनावरांची वाहतुक परवाना व वैद्यकिय अधिकारी यांच्याकडुन तपासणी करून घेतल्याचे कागदपत्रे आहेत काय ? अशी विचारणा केली असता त्याच्याकडे कोणतेही कागदपत्र अथवा परवाना नसल्याचे सांगितले. ही जनावरे सायगांव येथे घेऊन जात असल्याची माहिती दिली. पोलीस अंमलदार हनुमंत गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पिकअप चालक मोहम्मद जकरिया खुरेशी विरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार सीताराम डोंगरे हे पुढील तपास करीत आहेत.