अंबाजोगाई - येथील योगेश्वरी महाविद्यालयात नूतन व्यायामशाळेचे लोकार्पण आणि त्यानिमित्त आयोजित महाविद्यालयीन ‘बेस्ट फिजिक’ शरीरसौष्ठव स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये नियमित व्यायामाची गोडी निर्माण व्हावी, शारीरिक सुदृढतेला चालना मिळावी आणि निकोप जीवनशैलीचा प्रसार व्हावा या हेतूने आयोजित या स्पर्धेत बी.एस्सी. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी विशाल मुंडलिक याने प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली.
व्यायामशाळेचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण
महाविद्यालयाच्या अद्ययावत व्यायामशाळेचे उद्घाटन योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार प्रा. एन. के. गोळेगावकर, प्रा. माणिकराव लोमटे, क्रीडा प्रबोधिनी प्रमुख रमण सोनवळकर, प्राचार्य डॉ. एम. व्ही. कानेटकर, उपप्राचार्य डॉ. आर. व्ही. कुलकर्णी आणि कार्यालयीन अधीक्षक अजय चौधरी उपस्थित होते. नियमित व्यायाम हा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया असल्याचे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.
शरीरसौष्ठव स्पर्धेत चुरस
उद्घाटनानंतर रंगलेल्या ‘बेस्ट फिजिक’ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शारीरिक प्रमाणबद्धता, स्नायूंची ठेवण, पोझिंग आणि आत्मविश्वास या निकषांवर परीक्षकांनी विजेत्यांची निवड केली. यात महेश चोले (बी.सी.एस्सी. तृतीय वर्ष) याने द्वितीय तर प्रवीण डाके (बी.एस्सी. द्वितीय वर्ष) याने तृतीय क्रमांक पटकावला. सर्व विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. क्रीडा संचालिका डॉ. सारिका प्रभाकर जगताप यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!