केज - केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या पथकाने विडा ता. केज येथे छापा मारून चालता - फिरता कल्याण मटका नावाचा जुगार घेणाऱ्या एकास पकडले. त्याच्या कडील मटक्याचे साहित्य नगदी रक्कम, मोबाईल असा १५ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

विडा येथील ग्रामपंचायत समोर सार्वजनिक ठिकाणी एक जण चालता-फिरता कल्याण नावाचा मटका जुगार स्वतःच्या फायद्यासाठी पैशावर खेळत व खेळवीत असल्याची गुप्त माहिती केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशावरून जमादार अनिल मंदे, जमादार राजू गुंजाळ यांच्या पथकाने ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास अचानक छापा मारून स्वप्नील कैलास वाघमारे (रा. विडा) यास कल्याण नावाचा मटका घेताना रंगेहाथ पकडले. तर मटका खेळणारे लोक पोलिसांना पाहून पळून गेले. पोलिसांनी त्याच्याकडे मटक्याचे आकडे कोणास देतो, अशी विचारणा केली असता त्याने गणेश खराडे (रा. केज) यास १०% कमिशनवर देत असल्याचे सांगितले. पोलिसांनी अंगझडती घेऊन मटक्याचे साहित्य नगदी १ हजार ७६० रुपये, मोबाईल असा १५ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जमादार अनिल मंदे यांच्या फिर्यादीवरून स्वप्नील वाघमारे, गणेश खराडे या दोघां विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

जमादार उमेश आघाव हे पुढील तपास करीत आहेत.