कडा / पाटोदा (जि. बीड): बीड जिल्ह्याच्या वन्यजीव संवर्धनाच्या इतिहासात तब्बल एका शतकानंतर अत्यंत ऐतिहासिक घटना समोर आली आहे. सुमारे १०० वर्षांनंतर (१९१०-१९२० नंतर) बीड जिल्ह्यातील आष्टी आणि पाटोदा तालुक्यांच्या वनपरिक्षेत्रात पट्टेदार वाघाचे अस्तित्व अधिकृतरीत्या सिद्ध झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी भागातून प्रवास करत बीडच्या हद्दीत दाखल झालेल्या या वाघाने पाटोदा तालुक्यात दोन ठिकाणी जनावरांची शिकार केली असून, या घटनेमुळे वन्यजीवप्रेमींमध्ये उत्साहाचे तर स्थानिक ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे.

टिपेश्वर ते मराठवाडा थक्क करणारा प्रवास

चार वर्षे वय, २०० किलो वजन आणि १६ सें.मी. आकाराचा पंजा असलेला हा पूर्ण वाढ झालेला नर वाघ यवतमाळमधील टिपेश्वर अभयारण्यातील 'टी-२२' या वाघिणीचा बछडा आहे. २०२२ मध्ये जन्मलेल्या या वाघाने स्वतःचा भूप्रदेश (Territory) निर्माण करण्यासाठी पश्चिमेकडे प्रवास सुरू केला. गेल्या तीन वर्षांत त्याने यवतमाळ, लातूर, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर आणि बीड अशा ५ जिल्ह्यांत विस्तीर्ण भ्रमंती केली आहे.

ट्रॅप कॅमेऱ्यात कैद आणि शिकार

धाराशिव व येडशी रामलिंग अभयारण्यात कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर, २० ऑगस्ट रोजी आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव येथे वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात त्याचे छायाचित्र आले होते. हा वाघ दिवसभर दाट झुडपे व नाल्यांच्या सावलीत विश्रांती घेतो आणि रात्रीच्या वेळी बाहेर पडतो. पाटोदा तालुक्यातील सगळेवाडी आणि जरेवाडी शिवारात १७ ऑक्टोबर रोजी त्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी जनावरांची शिकार केली. एका भागात साधारण २० ते ३० दिवस मुक्काम करण्याचा त्याचा पॅटर्न असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.

वनविभागाकडून सतर्कतेचे आवाहन

आष्टी आणि पाटोदा तालुक्यांच्या सीमावर्ती भागात या वाघाचा वर्षातून सुमारे ४ महिने वावर असतो. सोलापूर, धाराशिव आणि बीडच्या सीमा हे त्याचे नियमित कॉरिडॉर बनले आहेत. पाटोदा परिसरात वाघाने शिकार केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे नागरिकांनी रात्रीच्या वेळी किंवा एकट्याने जंगल, डोंगर परिसर आणि पायथ्याशी जाणे टाळावे, तसेच गुराख्यांनी जनावरे चारताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.