राज्यातील संभाव्य दुष्काळजन्य परिस्थिती आणि रब्बी हंगामातील कमी पेरणीमुळे निर्माण होणाऱ्या चाराटंचाईवर मात करण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने सोमवारी (२ नोव्हेंबर) महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दुष्काळ व्यवस्थापन समितीने दिलेल्या शिफारशींनुसार चारा उत्पादन वाढवणे आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 'चारा साक्षरता अभियान' राबवण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
यंदाच्या पावसाळ्यात झालेली तूट आणि खरिपातील उत्पादनातील घटीमुळे पशुधनासाठी चारा कमी पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, कमी पाण्यात येणारी आणि बहुकापणीची चारा पिके जसे की मका, ज्वारी, बाजरी, न्यूट्रीफीड घेण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. रब्बी हंगामात चारा बियाण्यांची कमतरता भासू नये म्हणून कृषी आयुक्तांनी बियाण्यांची जिल्हानिहाय आणि पीकनिहाय मागणी निश्चित करून योग्य नियोजन करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, कृषी विद्यापीठे, तालुका बीज गुणन केंद्रे आणि महाबीजच्या मोकळ्या जमिनींवर रब्बी हंगामात चारा पिकांची प्राधान्याने लागवड केली जाणार आहे.
शेतकऱ्यांमध्ये चारा पिकांची लागवड, पाणी व्यवस्थापन आणि चाऱ्याचे संवर्धन याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभागाने समन्वयाने शिबिरे आयोजित करावीत, असेही या परिपत्रकात नमूद केले आहे. चाराटंचाईचा मुकाबला करण्यासाठी कृषी विभागाने उचललेले हे पाऊल पशुपालक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!