धारूर-वडवणी-चिंचवण-बीड या महत्त्वाच्या मार्गाची गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि एसटी महामंडळाचे कर्मचारी मेटाकुटीला आले आहेत.

धारूर आगारातून दर तासाला बीडकडे बस धावते, मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे आणि एसटीच्या जुन्या बसेसमुळे प्रवाशांना धक्के खात प्रवास करावा लागत आहे. खराब रस्त्यावरून बस चालवताना चालकांची मोठी दमछाक होत आहे. हा मार्ग उत्तर महाराष्ट्राला जोडणारा असल्याने चारपदरी होणार आहे, मात्र सध्या या रस्त्याच्या कामाची गती अत्यंत संथ आहे. या गंभीर प्रश्नाकडे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देऊन रस्त्याचे काम मार्गी लावावे आणि जुन्या बसेसऐवजी चांगल्या बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी संतप्त मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.