बीड: एका व्यावसायिकाला 'टँगो' ॲपवर ओळख झालेल्या महिलेने जाळ्यात ओढून, खाजगी व्हिडिओ रेकॉर्ड करत ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत या महिलेने तिच्या साथीदारासह व्यावसायिकाकडून लाखो रुपये उकळले आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत मूळ बीड जिल्ह्यातील हिवरापहाडी आणि हल्ली मुक्काम पुणे येथे असलेल्या ३६ वर्षीय व्यापार्याने फिर्याद दिली आहे. प्रिया देवी प्रसाद आणि तमन्ना रावत (दोघी मूळ रा. नेपाळ, हल्ली रा. दिल्ली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. फिर्यादीची मे २०२४ मध्ये प्रियाशी ॲपवर ओळख झाली होती. तिने व्हिडिओ कॉलद्वारे खाजगी व्हिडिओ बनवला आणि तो इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. या दोघींनी फिर्यादीला ऑगस्ट महिन्यात दुबईत हॉटेल बुक करण्यास भाग पाडले आणि त्यातूनही फसवणूक केली. बदनामीच्या भीतीने फिर्यादीने आरोपींना विविध बँक खाती आणि क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून तब्बल ४७ लाख रुपये दिले.
तसेच, या महिलांनी फिर्यादीच्या विरोधात दिल्ली येथे खोटी तक्रार दाखल केली होती, जी न्यायालयाने नंतर रद्द केली, असा दावा फिर्यादीने केला आहे. या महिला मूळच्या नेपाळी नागरिक असून बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवून भारतीय मुलींना वेश्या व्यवसायासाठी परदेशात नेल्याचा गंभीर आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायदा आणि पासपोर्ट अधिनियमानुसार फसवणूक आणि खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ हे करीत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!