केज - टाकळी (ता. केज) येथे सात एकर क्षेत्रावरील सोयाबीनचे पीक काढून त्याचा एकत्र ढीग करून चवाळ्याने झाकून ठेवला होता. अचानक लागलेल्या आगीत ढीग जळून खाक झाल्याने या शेतकऱ्याचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 

       टाकळी येथील शेतकरी बाबासाहेब वैजनाथ घुले यांची टाकळी शिवारात शेत सर्वे नं. ३६६, ३६७ मध्ये सात एकर जमीन असून या सात एकर जमिनीत पेरणी केलेले सोयाबीनचे पीक १५ दिवसांपूर्वी काढणी करून एकत्र ढीग करून चवाळ्याने झाकून ठेवला होता. ७ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास सोयाबीन पिकाच्या ढिगाला अचानक आग लागली. ही माहिती मिळताच बाबासाहेब घुले, त्यांच्या पत्नी संगीता घुले, गावाच्या पोलीस पाटील ज्योती घुले व इतर लोकांनी धाव घेतली. त्यांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग सर्वत्र पसरल्याने सोयाबीनचा ढीग विझवता आला नाही. तोपर्यंत सोयाबीन पिकाचा ढीग जळून खाक झाल्याने त्यांचे तीन लाख रूपायाचे नुकसान झाले आहे. मात्र सोयाबीनच्या ढिगाला आग कशाने लागली, याचे कारण स्पष्ट झाले नव्हते. याप्रकरणी बाबासाहेब घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक फौजदार तुकाराम मुरकुटे हे पुढील तपास करीत आहेत.