केज : शासनाने जाहीर केलेल्या कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केज तालुक्यातील टाकळी शिवारात तहसीलदार अशोक भंडारे यांनी गुरुवारी प्रत्यक्ष बांधावर जाऊन खरीप पिकांच्या नुकसानीची सविस्तर पाहणी केली. दुष्काळामुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांना शासकीय अनुदान आणि पीकविम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी महसूल, कृषी विभाग आणि ग्रामस्तरीय समितीच्या वतीने तालुक्यात युद्धपातळीवर पंचनामे सुरू आहेत.

बांधावर जाऊन पीक परिस्थितीचा घेतला आढावा

तहसीलदार अशोक भंडारे यांनी सकाळी नऊ वाजल्यापासून टाकळी शिवारातील मोरवंडी, सजगणी, तिरुका, कुंभार पट्टा, हुरा आणि मैनाई वस्ती या परिसरातील शेतांमध्ये जाऊन पिकांची स्थिती जाणून घेतली. या पाहणीदरम्यान मंडळ अधिकारी जी. डी. नादरगे, सहाय्यक कृषी अधिकारी रिंकल पवार, सरपंच सुनीता घुले, अनंतकुमार घुले, पोलीस पाटील ज्योती तांदळे यांच्यासह दिनकर घुले, बालासाहेब घुले, बंडू घुले, महादेव घुले व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विमा कंपनीच्या उपस्थितीत पीक कापणी प्रयोग

नुकसानीची वास्तवदर्शी तीव्रता तपासण्यासाठी विमा कंपनीचे राज्य प्रतिनिधी, जिल्हा प्रतिनिधी राहुल चौरे आणि तालुका प्रतिनिधी शिनगारे यांच्या उपस्थितीत एका निवडक शेतकऱ्याच्या शेतात पीक कापणी प्रयोग राबवण्यात आला. अधिकाऱ्यांसमक्ष झालेल्या या प्रयोगात अर्ध्या गुंठा क्षेत्रातून अवघे ५८५ ग्रॅम सोयाबीन हाती आले. या अत्यंत नीचांकी उत्पादनावरून परिसरातील शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान स्पष्ट झाले असून, बाधित शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी जोर धरत आहे.