बीड: शहरातील शिंदे नगर आणि इतर ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनांचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला असून दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून २४,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आशुतोष नाथ चौबे (वय ३८, रा. शिंदे नगर, फेज ३, बीड) हे नारायणा स्कूलमध्ये शिक्षक आहेत. ४ ऑक्टोबर रोजी ते झोपलेले असताना गॅलरीचा दरवाजा तोडून एका अज्ञात चोरट्याने त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे २२ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरून नेले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या आदेशावरून उपनिरीक्षक श्रीराम खटावकर आणि त्यांच्या पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. गुप्त माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी अभिषेक शेषेराव काशीद (वय २४, रा. चक्रधरनगर, बीड) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत शिवाजीनगर आणि बीड शहर पोलीस ठाण्यातील घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत आणि अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम खटावकर, अर्जुन यादव, अशपाक सयद, मनोज परजणे, विकी सुरवसे आणि नितीन वडमारे यांच्या पथकाने केली. शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!