जमिनीच्या सातबारा नोंदीच्या कामासाठी चक्क आठ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या केज तालुक्यातील उमरी सज्जाचे तलाठी फलके यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे. ही धडक कारवाई गुरुवार, ८ ऑक्टोबर रोजी दुपारी केज तहसील कार्यालय परिसरात करण्यात आली. भरदिवसा झालेल्या या कारवाईमुळे संपूर्ण केज महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला जमिनीशी संबंधित महसुली काम करून सातबारावर नोंद घ्यायची होती. यासाठी तलाठी फलके यांनी त्यांची अडवणूक करत लाचेची मागणी केली. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित व्यक्तीने थेट बीड एसीबीकडे धाव घेऊन तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने तहसील कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या अधिकाऱ्यांनी तलाठी फलके यांना रंगेहात ताब्यात घेतले.

विशेष म्हणजे, या कारवाईची चाहूल लागताच तहसील कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी तेथून पळ काढल्याची चर्चा आहे. सध्या तलाठी फलके यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एसीबीच्या या कारवाईमुळे सर्वसामान्यांची कामे अडवून पैसे उकळणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.