तलवाडा: गेवराई तालुक्यातील राहेरी शिवारात नदीकाठी जुन्या वादातून एका शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. रावसाहेब धोंडीराम फलके (वय ३७) हे शेतात असताना आरोपी बबन कडाजी फलके, आत्माराम कडाजी फलके, सागर फलके आणि आशाबाई फलके यांनी त्यांना गाठले.

आरोपींनी खोऱ्याचा दांडा, कुऱ्हाडीचा दांडा आणि बेल्टने रावसाहेब यांना बेदम मारहाण केली. यात बबन फलके व आशाबाई फलके यांनी रावसाहेब यांना खाली पाडून त्यांच्या पाठीवर व मानेवर मारहाण करत गंभीर जखमी केले. तसेच पोलिसांत तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस हवालदार देवकाते पुढील तपास करत आहेत.