अंबाजोगाई - शारदीय नवरात्रोत्सवाच्या उत्साहात आणि आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीची लगबग वाढली आहे. नवरात्र महोत्सवात दररोजच्या नऊ रंगांनुसार साड्या आणि कपडे परिधान करण्याचा उत्साह महिलांमध्ये शिगेला पोहोचला असून, यंदा पारंपरिक मराठमोळ्या नऊवारी साडीला महिला वर्गाकडून मोठी पसंती मिळत आहे. यामुळे कापड बाजारासह दागिन्यांच्या बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पारंपरिक मराठमोळ्या पेहरावाला वाढती मागणी

श्रावणमास, मंगळागौर आणि गणेशोत्सवापासून सुरू झालेली नऊवारी साडीची क्रेझ नवरात्रोत्सवात अधिकच वाढली आहे. नवरात्र आणि दांडियासाठी घागरा-चोली या आधुनिक पोशाखांसोबतच यंदा अस्सल पारंपरिक पेहरावाकडे महिलांचा कल वाढला आहे. मोठ्या शहरांप्रमाणेच स्थानिक भागातही तयार (रेडिमेड) नऊवारी साड्यांची खरेदी जोरात सुरू आहे. नाकात नथ, गळ्यात राणीहार, कपाळी चंद्रकोर, हातात चुडा, केसांच्या अंबाड्यावर माळलेला गजरा आणि पायात कोल्हापुरी चप्पल अशा परिपूर्ण मराठमोळ्या थाटात महिला नवरात्रोत्सव साजरा करत आहेत.

९०० रुपयांपासून साड्या उपलब्ध; दागिन्यांचीही रेलचेल

स्थानिक बाजारपेठेत सर्वसामान्यांपासून उच्चभ्रूंपर्यंत सर्वांच्या पसंतीस उतरतील अशा ९०० रुपयांपासून तब्बल १० हजार रुपयांपर्यंतच्या नऊवारी साड्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या पारंपरिक पेहरावाला साजेसे ऑक्सिडाइज्ड दागिने, चांदीचे दागिने, चांदीवर सोन्याचा मुलामा (गोल्ड प्लेटेड) दिलेले दागिने तसेच सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये महिलांची गर्दी होत आहे. सण-उत्सवाच्या या काळात बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.