बीड: मोठे स्वप्न घेवून विद्यार्थी एमपीएससीची तयारी करतात, परंतु एैनवेळी पेपरफुटी होते. यामुळे तरुणांच्या स्वप्नावर पाणी फिरते, याच कारणाने विद्यार्थ्यांच्या पाठीत आणि स्वप्नांवर वार करणारे एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी केली.
खा.बजरंग सोनवणे यांनी पुण्यात एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी दि.५ रोजी रात्री ११ वाजता भेट दिली. एमपीएससीच्या कारभारावर कडाडून टीका करतानाच, शासनाने तातडीने यात हस्तक्षेप करून एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा, अशी जोरदार मागणी खा.सोनवणे यांनी केली. या आंदोलनादरम्यान उपस्थितांनी 'बजरंगबली की जय' अशा घोषणा देत एकच परिसर दणाणून सोडला. पुण्यात विविध मागण्यांसाठी एमपीएससीचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करत आहेत. या आंदोलक विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी पोहोचलेल्या खा.बजरंग सोनवणे यांनी विद्यार्थ्यांच्या व्यथा, अडचणी आणि त्यांच्या मागण्या सविस्तरपणे ऐकून घेतल्या. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना खा.सोनवणे यांनी आपल्या भूतकाळातील संघर्षाची आठवण करून दिली. ते म्हणाले, मी स्वत: ग्रामीण भागातून आलो आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा हा संघर्ष आणि त्यांच्या पाठीमागे असणारे त्यांच्या आई-वडिलांचे अफाट कष्ट मला अतिशय जवळून माहीत आहेत. महाराष्ट्रातील होतकरू तरुणांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या महत्त्वाच्या लढ्यात मी पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. ही सर्व शेतकरी आणि कष्टकऱ्यांची लेकरे आहेत, त्यांच्या या न्याय्य अधिकाराच्या लढ्यात सर्वांनी एकत्र येऊन भक्कमपणे उभे राहणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. एमपीएससीच्या कारभाराबाबत आणि एकूणच परीक्षा व्यवस्थेविषयी विद्यार्थ्यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या सर्व प्रश्नांची कसून आणि निष्पक्ष चौकशी करून नेमकी जबाबदारी कोणाची, हे निश्चित करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. शासनाने या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष न करता अतिशय गांभीर्याने पाहावे आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांच्या सर्व मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहनही खा.बजरंग सोनवणे यांनी राज्य सरकारला केले.