बीड - भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात राबवण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी तसेच दावे व हरकती दाखल करण्यासाठी नागरिकांना आता २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या वाढीव मुदतीचा लाभ घेत जास्तीत जास्त नागरिकांना आणि विशेषतः नवमतदारांना मतदार यादीत आपले नाव सुलभतेने नोंदवता यावे, यासाठी राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर १७, १८ तसेच २४ आणि २५ ऑक्टोबर २०२६ या शनिवार व रविवारच्या सुट्टीच्या दिवशी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने जारी केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत आता २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढवण्यात आली असून, या प्रक्रियेनंतर राज्याची अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात आली होती. आता नव्याने मिळालेल्या मुदतवाढीचा सर्वंकष विचार करून या नवीन तारखांना पुन्हा विशेष शिबिरे घेण्यात येत आहेत, जेणेकरून कोणत्याही पात्र नागरिकाला नोंदणीपासून वंचित राहावे लागणार नाही.
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून सर्व संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना या शिबिरांचे यशस्वी आयोजन करून त्याचा नियमित अहवाल सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. प्रशासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा आणि ज्या पात्र नागरिकांनी व नवमतदारांनी अद्याप मतदार यादीत नाव नोंदवलेले नाही, त्यांनी आपल्या नजीकच्या मतदान केंद्रावर जाऊन या विशेष शिबिरांच्या माध्यमातून आपली नोंदणी आवर्जून पूर्ण करावी, असे आवाहन निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!