अंबाजोगाई - येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित मानवलोक समाजकार्य महाविद्यालयातील आजीवन अध्ययन व विस्तार केंद्राच्या वतीने शुक्रवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयात व्यापक स्वच्छता अभियान राबवण्यासोबतच गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव यांच्या सहकार्याने ‘गांधी विचार संस्कार परीक्षा २०२६’ चे यशस्वी आयोजन करण्यात आले.
परिसर स्वच्छता व श्रमप्रतिष्ठेचा संदेश
कार्यक्रमाची सुरुवात दोन्ही महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर महाविद्यालय परिसर आणि आसपासच्या भागामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी व स्वच्छ भारताचा प्रत्यक्ष संदेश दिला.
गांधींचे विचार आचरणात आणण्याचे आवाहन
याप्रसंगी मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव म्हणाले की, महात्मा गांधींनी सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि समतेचा दिलेला मार्ग आजही समाजाला दिशा देणारा आहे. तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा व राष्ट्रसेवेचा आदर्श प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे. स्वच्छता ही एका दिवसापुरती मर्यादित न राहता दैनंदिन जीवनाचा भाग बनली पाहिजे आणि गांधींचे विचार केवळ परीक्षेपुरते न ठेवता विद्यार्थ्यांच्या सामाजिक कार्यात दिसावेत, असे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थ्यांमध्ये सत्य, अहिंसा, स्वावलंबन व नैतिक मूल्यांचे संस्कार रुजवण्यासाठी आयोजित केलेल्या ‘गांधी विचार संस्कार परीक्षे’ला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. या कार्यक्रमास डॉ. नजीर शेख, डॉ. अरुंधती पाटील, प्रा. सुकेशनी जोगदंड, डॉ. किसान शिनगारे, आजीवन अध्ययन व विस्तार केंद्र समन्वयक डॉ. हनुमंत साळुंखे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!