माजलगाव जलाशयातून मंगरूळ १ आणि २ परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर पाणी उपशाविरोधात प्रशासनाच्या संयुक्त पथकाने १० ऑक्टोबर रोजी धडक कारवाई केली. या मोठ्या मोहिमेत तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून तब्बल ३५० पाण्याच्या मोटारी आणि ५० सोलर पॅनेल काढून जप्त करण्यात आले आहेत. या आक्रमक कारवाईमुळे अवैध पाणी उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

धरणातील पाणीसाठ्याचे महत्त्व लक्षात घेता ही कारवाई करण्यात आली असून, संबंधित शेतकरी आणि ग्रामस्थांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. यापुढे जलाशयातून कोणत्याही प्रकारचा अवैध पाणी उपसा करणार नसल्याचे लेखी आश्वासन त्यांच्याकडून लिहून घेण्यात आले आहे. अशी कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहील, असा स्पष्ट इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. ही कारवाई माजलगाव धरण प्रशासन, पाटबंधारे, महसूल, पोलीस आणि विद्युत वितरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आली. या मोहिमेत उपअभियंता शितल माने, एस. एस. शेख, मंडळ अधिकारी हंगे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.