केज: शहरातील 'हनुमान ज्वेलर्स' या सराफी दुकानातून दागिने खरेदीच्या बहाण्याने सुमारे सहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हातोहात लांबवणाऱ्या टोळीचा केज पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित महिला रिजवाना जाकीर शेख (वय ३५) हिला नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून अटक करण्यात आली असून, तिच्याकडून ४ लाख ४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
दिनांक १ जुलै २०२६ रोजी दुपारी तीन बुरखाधारी महिलांनी दुकानात येऊन दागिने पाहण्याच्या बहाण्याने ४७ ग्रॅम वजनाचे चार सोन्याचे गंठण लंपास केले होते. व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात तीन अज्ञात महिलांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध शाखेने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल कॉल डेटाचे तांत्रिक विश्लेषण केले. तपासात एक संशयित कार आणि मोबाईल क्रमांक पोलिसांच्या रडारवर आला.
मालेगावात सापळा रचून कारवाई
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने, अमिरोद्दीन इनामदार आणि पथकाने मालेगाव गाठले. स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने मालेगावमधील विजयनगर परिसरातून संशयित रिजवाना शेख हिला ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली आणि तिच्या इतर दोन साथीदार महिलांची नावे उघड केली.
पोलिसांनी तिच्याकडून ३१ ग्रॅम वजनाचे तीन मिनी गंठण आणि ५९ सोन्याचे मणी असा एकूण ४ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रिजवाना आणि तिच्या टोळीवर मुंबईतील नागपाडा, कुर्ला तसेच धुळे जिल्ह्यातही चोरीचे गुन्हे दाखल असून त्या सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. न्यायालयाने आरोपी महिलेला पोलीस कोठडी सुनावली असून, फरार साथीदारांचा शोध आणि इतर गुन्ह्यांचा तपास केज पोलीस करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!