केज: केज शहरातून गेल्या तीन दिवसांच्या कालावधीत दोन महिला आणि एका पुरुषाला अज्ञात कारणावरून फूस लावून पळवून नेल्याच्या तीन स्वतंत्र घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारींवरून केज पोलीस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना ३ सप्टेंबर रोजी घडली. केज शहरातील एका भागातील विवाहित महिलेचा पती कामानिमित्त पुणे येथे गेला होता. दोन्ही मुलांना सासू-सासऱ्यांकडे सोपवून गेलेल्या या ३५ वर्षीय विवाहितेला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. या महिलेची उंची ४ फूट ५ इंच, रंग सावळा असून अंगात फिकट गुलाबी साडी आहे. पतीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
दूध आणायला गेलेली तरुणी बेपत्ता
दुसऱ्या घटनेत, १३ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास केज-बीड रस्त्यावरील गुरुमुख हॉटेलसमोरील डेअरीवर दूध आणण्यासाठी गेलेली १९ वर्षीय विवाहित तरुणी घरी परतलीच नाही. अज्ञात व्यक्तीने तिला आमिष दाखवून पळवून नेल्याची तक्रार तरुणीच्या आईने पोलिसांत दिली आहे.
कामावर गेलेला तरुणही बेपत्ता
तिसऱ्या घटनेत, कळंब रोडवरील वॉटर प्लांटवर काम करणारा अजिम महेबुब सय्यद (वय ३२, रा. कळंब रोड, केज) हा दोन मुलींचा पिता १२ सप्टेंबर रोजी कामावर गेल्यानंतर घरी परतला नाही. गोरा रंग, आकाशी शर्ट आणि निळी जीन्स घातलेल्या अजिमला फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद त्याच्या पत्नीने नोंदवली आहे.
एकाच शहरातून तीन दिवसांत घडलेल्या या लागोपाठ घटनांमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात असून पोलीस कॉन्स्टेबल त्रिंबक सोपने आणि बजरंग मुंडे पुढील तपास करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!