नवी दिल्ली: येथे मंगळवारी सुप्रीम कोर्टाने कॅन्सरसारख्या गंभीर आजारांच्या औषधांच्या अवाढव्य किंमतींवरून तीव्र संताप व्यक्त केला. किरकोळ विक्रेत्यांना केवळ २,७०० रुपयांना मिळणाऱ्या औषधावर थेट २७,००० रुपये एमआरपी (अधिकतम किरकोळ किंमत) छापून रुग्णांची उघडपणे लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औषधांच्या किंमतींवर नियंत्रण आणण्यासंदर्भातील याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने या नफेखोरीला 'दिवसाढवळ्या टाकलेला दरोडा' असे संबोधले असून, यंत्रणांच्या ढिसाळपणावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
रुग्णांच्या हतबलतेचा गैरफायदा
विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने अत्यंत परखड शब्दांत या लुटीचा समाचार घेतला. कॅन्सरसारख्या आजारावरील उपचारांसाठी आधीच सर्वसामान्य नागरिक कर्जबाजारी होतात. स्वतःचे घर, दागिने विकून लोक उपचाराचा खर्च भागवतात. अशा परिस्थितीत मूळ किंमतीपेक्षा दहा पट अधिक रक्कम रुग्णांकडून उकळणे, ही केवळ नफेखोरी नसून निर्दयी खंडणी आहे, अशा शब्दांत कोर्टाने संताप व्यक्त केला. नफेखोरी रोखण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणा या सर्व प्रकारावर मूग गिळून गप्प का आहेत, असा संतप्त सवालही न्यायालयाने उपस्थित केला.
तुकाराम मुंढे यांनी उघड केली होती नफेखोरी
रुग्णांच्या या आर्थिक शोषणाचा मुद्दा काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही चव्हाट्यावर आणला होता. मुंढे यांनी केलेल्या सर्वेक्षणात, ११ रुपयांचे आयव्ही सेट ३२५ रुपयांना, तर ६ रुपयांचे सिरिंज ५७ रुपयांना विकले जात असल्याचे समोर आले होते. तब्बल २८०० टक्क्यांपर्यंत नफा उकळला जात असल्याचा अहवाल त्यांनी राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाकडे (एनपीपीए) पाठवला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने याच वाढीव किंमती आणि एमआरपीच्या मुद्द्यावर कठोर भूमिका घेतल्याने, औषध कंपन्या आणि रुग्णालयांच्या मनमानीला चाप लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुढील सुनावणी आणि कारवाईची दिशा
सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर पुढील सुनावणी २९ सप्टेंबर रोजी होणार आहे. या याचिकेत औषधांच्या किंमतींवर कडक नियंत्रण आणण्याची आणि जेनेरिक औषधांच्या वापराला प्रोत्साहन देण्याची मागणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या वतीने के. एम. नटराज यांनी बाजू मांडली, तर औषध कंपन्यांच्या वतीने कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. या संपूर्ण प्रकारामुळे देशातील आरोग्य व्यवस्थेतील असुरक्षितता आणि रुग्णांना सहन करावा लागणारा नाहक त्रास पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
#SupremeCourt #CancerDrugs #HealthcareScam #TukaramMundhe #
MedicalMafia













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!