इंजेगाव (ता. परळी, जि. बीड) - सध्याच्या एल निनोच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना हवामान अनुकूल शेती आणि संघटित शेतीबाबत मार्गदर्शन करण्याच्या अनुषंगाने इंजेगाव येथे एका भव्य शेतकरी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे, उपविभागीय कृषी अधिकारी राहुल गायकवाड आणि तालुका कृषी अधिकारी डॉ. अर्चना नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली किसान बायो ऑरगॅनिक प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, इंजेगाव, नानाजी देशमुख कृषी संजीवनी (एनडीकेएसपी) प्रकल्प आणि पारादीप फॉस्फेट्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमात कृषीभूषण नाथराव कराड यांनी एल निनोचा प्रभाव लक्षात घेता शाश्वत शेती करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक उपविभागीय तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सामूहिक शक्तीचा वापर करून शेतकरी बाजारपेठेतील आव्हानांवर मात करू शकतात. यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतात. शेतकरी उत्पादक कंपन्यांमुळे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेत प्रवेश मिळतो, ज्यामुळे शेतमालाला योग्य मोबदला मिळणे सुलभ होते. तसेच सामूहिक खरेदी-विक्रीमुळे मध्यस्थांची साखळी नष्ट होऊन शेतकऱ्यांचा नफा वाढतो आणि शेतीपूरक व्यवसायाला नवी दिशा मिळते, ही माहिती देऊन येळकर यांनी एनडीकेएसपी प्रकल्पांतर्गत असलेल्या शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांची माहिती दिली.
तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन अनुदानाचा लाभ घेण्यासाठी 'सीबीडीसी' योजना विस्तृतपणे समजावून सांगितली. तसेच, साखर कारखाने चालू होण्यासाठी थोडा अवधी असल्याने कमी पाण्यामध्ये ऊस पिकाचे व्यवस्थापन कसे करावे, जैविक व अजैविक ताण कमी करण्यासाठी ड्रोनच्या साह्याने फवारणी करावयाच्या निविष्ठांची सविस्तर माहिती दिली.
हवामान बदल लक्षात घेत संरक्षित पाणी असलेल्या शेतकऱ्यांनी ऊस बेणे संवर्धनासाठी करावयाचे नियोजन, तूर व हरभरा पिकांमधील रोग नियंत्रण आणि कापूस पिकातील मावा नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले. ऊस पिकातील पायरीला किडीवर नियंत्रण ठेवणाऱ्या मित्र कीटकांच्या जीवन अवस्था प्रत्यक्ष दाखवून त्यांच्या संवर्धनाबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले व 'महाविस्तार एआय' ॲपच्या वापराविषयी माहिती दिली.
पारादीप फॉस्फेट्स लिमिटेडचे अधिकारी किरण शिंदे आणि राहुल पाटील यांनी कंपनीच्या शेतकरी उपयोगी उत्पादनांबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जिल्हा व्यवस्थापक सूर्यकांत मुंडे यांनी केले. यावेळी बालासाहेब बाबुराव कराड, सरपंच अमोल कराड, मारुती कराड, पांगरीचे पोलीस पाटील हरिभाऊ कराड, नृसिंह कृषी सेवा केंद्राचे संचालक मधुकर शिरसाठ, प्रगतिशील शेतकरी धनंजय कराड, पारादीप फॉस्फेट्स लिमिटेडचे अधिकारी किरण शिंदे, राहुल पाटील, अमजद पठाण, पृथ्वीराज लांडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात इंजेगाव, कौठळी, नाथरा, पांगरी, पिंपळगाव गाडे परिसरातील सुमारे २३० शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!