बीड - उस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी युवा शेतकरी संघर्ष समिती व उस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आज जिल्हा प्रशासनाकडे विविध मागण्यांसाठी पाठपुरावा करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आगामी ऊस गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊसदराचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च, वाढलेली महागाई, मजुरी, खते, औषधे, वीज तसेच ऊस लागवडीसाठी होणारा मोठा खर्च लक्षात घेऊन शेतकऱ्यांना योग्य ऊसदर मिळणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. निवेदनाची दखल घेत संबंधित साखर कारखानदार तसेच युवा शेतकरी संघर्ष समिती आणि ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या प्रतिनिधींची बैठक लावण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. या बैठकीत उसदर, पहिली उचल, अंतिम दर आणि शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.

उसदराचा प्रश्न हा केवळ एका शेतकऱ्याचा प्रश्न नसून संपूर्ण ऊस उत्पादक शेतकरी वर्गाच्या आर्थिक भवितव्याशी संबंधित आहे. त्यामुळे प्रशासनाने बैठकीचे आश्वासन प्रत्यक्षात आणून कारखानदार आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्यासोबत तातडीने चर्चा घडवून आणावी, अशी मागणी दोन्ही समित्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत युवा शेतकरी संघर्ष समिती व उस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचा पाठपुरावा सुरूच राहणार, अशी भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली.

पोलिस अधीक्षक कार्यालयातही भेट शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सुरू असलेल्या लोकशाही मार्गाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयातही भेट घेऊन चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांचे प्रश्न शांततामय व लोकशाही मार्गाने मांडताना प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य मिळावे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.