केज - तालुक्यातील मुख्यमंत्री व प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या रस्त्यांच्या कामात मोठा गैरव्यवहार आणि निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी अंबाजोगाई-कळंब महामार्गावरील सावळेश्वर येथे तब्बल दोन तास तीव्र रास्ता रोको आंदोलन केले. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात चंदनसावरगाव, जवळबन, सावळेश्वर, लाडेगाव, आवसगाव आणि नायगाव येथील शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते. अचानक पुकारलेल्या या आंदोलनामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
हाताने उखडतोय डांबर; गुणवत्तेवर गंभीर प्रश्न
चंदनसावरगाव–जवळबन–सावळेश्वर–आवसगाव या रस्त्याचे काम धाराशिव येथील सिद्धेश्वर कन्स्ट्रक्शन, तर जवळबन–लाडेगाव रस्त्याचे काम केज येथील राज कन्स्ट्रक्शनमार्फत करण्यात आले होते. मोठा पाऊस किंवा नैसर्गिक आपत्ती नसतानाही वर्षभरातच रस्ते खचून उखडू लागले असून, काही ठिकाणी डांबर चक्क हाताने निघत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या कामांची गुणनियंत्रण विभागामार्फत तातडीने सखोल चौकशी करावी, निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे आणि रस्त्यांची पुढील पाच वर्षांसाठी दर्जेदार दुरुस्ती करावी, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली.
प्रशासनाकडून लेखी आश्वासन; बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा
पुढील पंधरा दिवसांत रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास बीड येथील कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा कुलदीप करपे यांनी दिला. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता एम. एम. पाटील यांनी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात उपअभियंता व गाव प्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पुनस्तपासणी करण्याचे आणि दोषींवर कार्यवाही करण्याचे लेखी पत्र दिले. या आंदोलनात ज्येष्ठ शेतकरी नेते सतीश शिंदे, डॉ. हनुमंत सौदागर, दिलीप लोंढे, प्रताप भाकरे, राहुल खोडसे, डॉ. शिवाजी मस्के, सरपंच प्रमोद करपे, सरपंच विश्वास शिनगारे यांच्यासह अनेक मान्यवर व शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते, तर युसुफ वडगाव पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!