बीड: ठेवीदारांचे पैसे परत करण्यात अपयशी ठरल्याने राज्य शासनाने बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीवर मोठी धडक कारवाई केली आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार राज्याच्या प्रधान सचिवांनी १ ऑक्टोबर रोजी ज्ञानराधाच्या तब्बल २२७ कोटी ४८ लाख रुपयांच्या नऊ मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
या मोठ्या कारवाईत बीडमधील सात, तर छत्रपती संभाजीनगरमधील सय्यदपूर आणि सातारा जिल्ह्यातील फलटण येथील प्रत्येकी एका मालमत्तेचा समावेश आहे. यामध्ये तिरूमला समूहाच्या विविध ऑइल मिल, जिनिंग, रिफायनरी आणि डेअरी प्रकल्पांच्या मशिनरी व साहित्यावर जप्ती आणण्यात आली आहे. मुदत संपल्यानंतरही ठेवीदारांना त्यांचे पैसे आणि व्याज परत न केल्याने संस्थेच्या अध्यक्ष, संचालक आणि व्यवस्थापकांवर वैजापूरसह इतर ११० पोलीस ठाण्यांत फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ठेवीदारांचे हित जपण्यासाठी शासनाने हे कठोर पाऊल उचलले असून, या जप्त केलेल्या सर्व मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बीडच्या उपजिल्हाधिकाऱ्यांची प्राधिकारी म्हणून विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. या कारवाईमुळे फसवणूक झालेल्या हजारो सामान्य ठेवीदारांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!