अंबाजोगाई: मानवलोक आणि जनसहयोगच्या वतीने लोकसहभागातून १२० गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ आणि किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. समाजातील वंचित आणि निराधार घटकांना सणाचा आनंद मिळावा, या हेतूने आयोजित केलेला हा उपक्रम उपेक्षितांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा ठरला.
संस्थेचे संस्थापक बाबूजी यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेला हा मदतीचा यज्ञ आजही अविरत तेवत आहे. अण्णासाहेब रोहम यांनी ग्रामीण भागातील वृद्धांसाठी चालवल्या जाणाऱ्या कम्युनिटी किचनची आणि सकस आहाराची माहिती दिली. रमा पांडे आणि प्रकाश जाधव यांनी बाबूजींच्या सामाजिक योगदानाला उजाळा दिला. अनिकेत लोहिया यांच्या पुढाकाराने खेड्यापाड्यात राबवल्या जाणाऱ्या 'तृप्ती' उपक्रमामुळे आज हजारो एकाकी वृद्धांना जगण्याचा हक्काचा आधार मिळाला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
सिनर्जी नॅशनल स्कूलच्या भाविका शहा यांनीही शाळेच्या वतीने किराणा किटची मदत सुपूर्द केली. समाजातील ही दाहकता आणि सेवाभाव शाळकरी मुलांनी जवळून पाहिल्यास त्यांच्यावर लहान वयातच संवेदनशीलतेचे संस्कार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी मोनिका भावठणकर, नेहा बुर्गे, सचिन शिंदे, तुषार उपस्थित होते. अधिकाधिक दानशूर व्यक्तींनी या पवित्र कार्यात जोडले जावे, असे भावनिक आवाहन मानवलोक परिवारातर्फे करण्यात आले आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!