मिलिटरी कॅन्टीनचे दारू खरेदीचे कार्ड देण्यास नकार दिल्याने शेजाऱ्याने एका ६१ वर्षीय माजी सैनिकावर विटा आणि दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना केज तालुक्यातील होळ शिवारात घडली. या अमानुष हल्ल्यात माजी सैनिक श्रीमंत दशरथ शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत.

श्रीमंत शिंदे हे ४ ऑक्टोबर रोजी दुपारी आपल्या शेतात असताना शेजारी राहणारा नेताजी व्यंकटराव लोमटे तिथे आला. त्याने शिंदे यांच्याकडे लष्कराच्या कॅन्टीनमधून दारू घेण्यासाठी कार्डची मागणी केली, मात्र शिंदे यांनी नकार दिला. या रागातून आरोपीने त्यांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि पाठीत वीट व डोक्यात मोठा दगड घालून रक्तबंबाळ केले. या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.