नेकनूर: दरोड्याच्या गुन्ह्यात दीड वर्षापासून फरार असलेला अट्टल गुन्हेगार बालाजी ऊर्फ आबड्या अजिनाथ शिंदे (वय २२, रा. मांडवा, जि. धाराशिव) यास नेकनूर पोलिसांनी ९ ऑक्टोबर रोजी रात्री शिताफीने अटक केली. अटकेनंतर पोलीस कोठडीत असताना १० ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वादोनच्या सुमारास त्याने पांघरुणाच्या कापडाने गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, ड्युटीवरील पोलीस अंमलदारांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे त्याचा जीव वाचला. प्रथमोपचारानंतर प्रकृती स्थिर झाल्याने न्यायालयाने त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्यावर स्वतंत्र गुन्हा नोंदवला आहे.