बीड (प्रतिनिधी): - शहरातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारी (६ ऑक्टोबर) धानोरा रोडवरील टी-पॉईंट भागात मटका जुगारावर दोन स्वतंत्र धाडी टाकल्या. या धडक कारवाईत पोलिसांनी मोटारसायकलसह एकूण १ लाख ५४ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

धानोरा रोड टी-पॉईंट परिसरात सलग दोन कारवाया

शिवाजीनगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास टी-पॉईंट परिसरात पहिली कारवाई करण्यात आली. यावेळी मटका जुगार चालवणारा संशयित रफीक बेग चाँद बेग याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून रोख २ हजार १३० रुपये, आकडेमोडीच्या चिठ्ठ्यांचे बुक, कार्बन पेपर व पेन असा जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले.

त्यानंतर अवघ्या दीड तासात, म्हणजेच सव्वासात वाजेच्या सुमारास पोलिसांनी त्याच परिसरात दुसरी कारवाई करत सुलतान खान सदाद पठाण याला मटका जुगार खेळवताना रंगेहात पकडले. त्याच्या ताब्यातून रोख १ हजार ९०० रुपयांसह जुगाराचे साहित्य आणि सव्वा लाख रुपये किमतीची होंडा कंपनीची मोटारसायकल (क्रमांक MH 23 BE 9582) असा एकूण १ लाख ५१ हजार ९०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

अवैध धंदे चालवणाऱ्यांना पोलिसांचा कडक इशारा

या दोन्ही कारवायांमध्ये एकूण १ लाख ५४ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, दोन्ही आरोपींविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. शहरात अवैध जुगार, मटका अथवा कोणतेही बेकायदेशीर धंदे चालवणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर मोहीम राबवण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले आणि पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माधव काटकर, ज्ञानेश्वर धोत्रे, पोलीस हवालदार रवींद्र आघाव, पोलीस शिपाई सुरज वाघमारे आणि राजाभाऊ जाधव यांच्या पथकाने केली.