बीड: शहरातील संस्कार शाळेत कार्यरत असलेले शिक्षक संदीप विलास जोशी (वय अंदाजे ४०) यांचा मृतदेह आज सकाळी खंडेश्वरी परिसरातील एका विहिरीत आढळून आला. गेल्या दोन दिवसांपासून ते घरातून बेपत्ता होते. या दुर्दैवी घटनेने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, संस्थाचालकाच्या मानसिक आणि आर्थिक त्रासाला कंटाळूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

दोन दिवसांपासून होते बेपत्ता

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप जोशी हे मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी पेठ बीड पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती. नातेवाईक व पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असतानाच, आज सकाळी खंडेश्वरी मंदिर परिसरातील एका विहिरीमध्ये त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पेठ बीड आणि बीड शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

सुसाइड नोटवरून उलटसुलट चर्चा

शिक्षकाने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे. मात्र, या संदर्भात बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बांगर यांच्याशी संपर्क साधला असता, नातेवाईकांनी अद्याप पोलिसांकडे कोणतीही सुसाइड नोट सुपूर्द केलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या चिठ्ठीमध्ये नेमके काय लिहिले आहे आणि कुणाची नावे नमूद आहेत, याविषयी विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.