अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर शिवारात शेतातील पाणी उपसण्याच्या वादातून ६५ वर्षीय सेवानिवृत्त पोलीस अंमलदारावर शेजाऱ्यांनी कत्तीने हल्ला चढवला. आरोपींनी त्यांच्या खिशातील साडेदहा हजार रुपयांची रोख रक्कमही बळजबरीने काढून घेतली. ही घटना ९ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली.

निवृत्त पोलीस नागोराव रामराव माळवे यांच्या शेतात गंगाधर माळवे, अशोक माळवे, बकुळा माळवे आणि कल्पना माळवे यांनी पाणी उपसण्यावरून वाद घातला. गंगाधरने कत्तीने नागोराव यांच्या हातावर वार करून जखमी केले. तसेच सोयाबीन काढणीसाठी खिशात ठेवलेले १०,५०० रुपये आरोपींनी हिसकावून घेतले आणि सोडवायला आलेल्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडले. बर्दापूर पोलीस ठाण्यात चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.