बीड तालुक्यातील तांदळवाडी घाट येथे बाभळीची लाकडे दुसऱ्या व्यक्तीला विकल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका ४५ वर्षीय मजूर महिलेला काठीने बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही घटना ६ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. तांदळवाडी घाट येथे राहणाऱ्या लता नारायण वाघमारे या त्यांच्या घरासमोर असताना गावातीलच काशीनाथ आण्णाभाऊ काळे तिथे आला. 'तू बाभळीची लाकडे मला विकलेली असताना, माझ्या परस्पर ती दुसऱ्याला का विकली?' असा जाब विचारत त्याने लताबाईंसोबत वाद घालायला सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी काशीनाथ याने शिवीगाळ करत हातातील लाकडी काठीने त्यांच्या पाठीवर, पायावर, तसेच हाताच्या मनगटावर व दंडावर सपासप वार केले.
या अमानुष मारहाणीत लताबाई गंभीर जखमी झाल्या असून, आरोपीने त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. या धक्कादायक घटनेनंतर जखमी लता वाघमारे यांनी थेट नेकनूर पोलीस ठाणे गाठून संध्याकाळी तक्रार दिली. यावरून पोलिसांनी काशीनाथ काळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शेख करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!