आष्टी: तालुक्यात दुष्काळाच्या तीव्र झळांमुळे शेतकरी हवालदिल झाला असून, सरकारने केवळ घोषणा न करता थेट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रवक्ते तथा युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी केली आहे. धामणगाव येथे आयोजित 'शेतकरी आक्रोश रास्ता रोको' आंदोलनात ते बोलत होते. पिकांचे नुकसान, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि हाताला काम नसलेले शेतमजूर यांच्या व्यथा मांडत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
भरीव मदतीची गरज
शेख यांनी स्पष्ट केले की, सरकारने आष्टीसह राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असला तरी, केवळ कागदी घोषणांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आणि शेतमजुरांना पंचवीस हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे. यासोबतच दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची संपूर्ण वर्षाची शैक्षणिक फी आणि वसतिगृहाचा तसेच भोजनाचा खर्च शासनाने उचलावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. शेतकरी भीक मागत नसून हक्काची मदत मागत असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
पशुधन जगवण्याचे मोठे आव्हान
आष्टी तालुक्यात दुग्ध व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. चारा आणि पाण्याच्या टंचाईमुळे पशुधन जगवणे कठीण झाले आहे. त्यामुळे जनावरांसाठी पुरेसा चारा आणि शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा करण्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखवली. मागील वर्षीच्या अतिवृष्टीची प्रलंबित भरपाईही तत्काळ देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास यापुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेख यांनी दिला. या आंदोलनात युवक जिल्हाध्यक्ष सतीश शिंदे, विजय गाढवे यांच्यासह शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!